
Honey Trap To Destabilize Government: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 15 आमदार आणि 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा दावाही राऊत यांनी केला असून आपण लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं. तसेच राज्यातील सरकार पाडण्याचा हिंदुत्वाशी तसेच निधीशी काहीही संबंध नसल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
सीडीचं आदान-प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तांतरणाच्या घडामोडींदरम्यान रात्री लपूनछपून भेटायचो असा खुलासा केला होता. त्याचाच आधार घेत राऊतांनी, “ते जे हुडी घालून जात होते ते सीडीचं आदान-प्रदान करण्यासाठी जात होते,” असा दावा केला आहे. तसेच, “विजय वाडेट्टीवार यांनी थोडी माहिती दिली असून मी त्याची संपूर्ण माहिती देईल” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
आता भाजपच्या महिला कुठे आहेत?
“सध्याचे सरकार महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार आहे. त्यांचे आमदार मंत्री जे वर्तन करत आहेत तसं कधी घडलं नव्हतं. काल तटकरे समोर त्यांच्या पदाधिका-यानं छावा संघटनेच्या पदाधिका-यांना मारहाण केली. मंत्र्याच्या बारमधून महिला सापडल्या आता भाजपच्या महिला कुठे आहेत?” असा सवाल राऊत यांनी केला आहे.
पोस्ट केला तो व्हिडीओ…
दरम्यान, राऊत यांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन, “मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध आणि पानी का पानी होईल!” असं म्हणत एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये मंत्री गिरीष महाजन एका व्यक्तीच्या हाताने पेढा खाताना दिसत आहेत. ही व्यक्ती प्रफुल्ल लोढा असल्याचा दावा केला जात आहे. “4 मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार (तेव्हा) याच ट्रॅपमुळे पळाले,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.
मुख्य मंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात,
महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले:
या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या!
दुध का दूध पानी का पानी होईल!
४ मंत्री
अनेक अधिकारी अडकले आहेत!
शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅप मुळे पळाले .
pic.twitter.com/DduL723OOw— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2025
‘नाव फडणवीस असले तर संस्कार दिसत नाही’
“4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. माझ्या ट्विटची सत्यता पडताळून पाहा,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. “आमचे खासदार फुटले. त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होते. त्यांच्यावर दबाव आणला मग शुद्धीकरण करून घेतले,” असं राऊत म्हणाले. “कायद्याची पदवी म्हणजे सुसंस्कृतपणा नाही. नाव फडणवीस असले तर संस्कार दिसत नाही. लोढानं हनी ट्रॅप केला. त्यांची सूत्रं जामनेरमधून आहेत. मुंबई-दिल्लीतही धागेदोरे आहेत. लोढाचा पेनड्राईव्ह शोधावा. त्यात दोन मंत्री भाजपचे आहेत. प्रफुल्ल लोढा यानं भाजपच्या नेत्यांनाही अडकवलंय. प्रफुल्ल लोढा यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत फोटो आहेत,” असं राऊत म्हणालेत.
मी सगळे व्हिडीओ पाहीले
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले. “अशा केसेसमध्ये तक्रारदार नसतो फडणवीस यांच्या बाजूला हनी ट्रॅपवाले बसले होते. हनीट्रॅपची सुरूवात महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी झाली आहे. मी आणि खडसे यांनी हे सगळे व्हिडीओ पाहीले आहेत,” असा दावा राऊत यांनी केला आहे.
मरीन लाईन्सच्या पुलाखाली मीटींग
तसेच, “मरीन लाईन्सच्या पुलाखाली मीटींग घेतल्या. त्या बैठकीत सीडी दाखविली आणि मग खासदार आमदार गेले. प्रताप सरनाईकने हनी ट्रॅपचा अभ्यास करावा आणि हनी ट्रॅप ठाण्यापर्यंत कसं पोहोचलं हे पहावं एकनाथ शिंदे यांना भविष्य आहे का? भाजपला शिंदेंचं ओझं झालंय,” असा टोमणा राऊत यांनी मारला.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
लैंगिक, रोमँटिक भावभावनांना शस्त्र म्हणून एखाद्या ठराविक हेतूसाठी वापर करण्यात येतो. या पद्धतीत गुप्तहेर महिलांच्या किंवा महिलांच्या नावांच्या माध्यमातून नामांकित व्यक्तींना जाळ्यात ओढून गुप्तपणे त्याचं चित्रिकरण करुन नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी या चित्रिकरणाचा वापर केला जातो.