CID Chargesheet Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची क्रूरता दर्शवणारे काही फोटो समोर आले आहेत. सीआयडीने 1500 पानांचं चार्जशीट दाखल केलं असून, त्यात व्हिडीओतून काढण्यात आलेल्या स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. सीआयडीने चार्जशीमध्ये हत्या नेमकी कशाप्रकारे करण्यात आली याचा संपूर्ण उलगडा केला आहे. 1500 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलं असून, त्यात आठ आरोपींची नावं आहेत.
हत्याकांडाचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहताना थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. चार्जशीट मध्ये एक व्हिडीओ जोडण्यात आला आहे. हत्या करतानाच हा लाईव्ह व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. आरोपींच्या मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये फोटो, व्हिडीओ टाकण्यात आले होते. सीआयडीने हे फोटो, व्हिडीओ ताब्यात घेतले आहेत. पुराव्यांच्या यादीत हे फोटो समाविष्ट करण्यात आले आहेत.
सीआयडीने जो व्हिडीओ जोडला आहे, त्यातील काही स्क्रीनशॉट काढण्यात आले आहेत. ज्या व्यक्ती या व्हिडीओमध्ये दिसत आहेत त्यांचे चेहरे मॅच करून बघितले असून ते मॅच होतात असं सांगितलं आहे. फोटोत संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली जात असताना दिसत आहे. एका फोटोमध्ये संतोष देशमुख यांच्या छातीवर पाय ठेवून फोटो काढण्यात आलेला आहे. तो फोटो आरोपपत्राच्या परिशिष्टामध्ये जोडण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे दोन ते तीन फोटो आहेत, जे व्हिडीओ काढताना अगदी जवळ जाऊन काढण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, संतोष देशमुखांना मारहाण करत असताना आरोपींच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नव्हता, ते हसत होते.
संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना एक आरोपी सेल्फी काढत होता. मागे रक्तबंबाळ असणारे संतोष देशमुख दिसत असताना एक आरोपी हसत हसत सेल्फी काढताना या फोटोमध्ये दिसत आहे. असे दोन फोटो आहेत ज्यामध्ये दोन वेगवेगळे आरोपी आहेत.
संतोष देशमुख यांना मारहाण करताना त्यांच्या चेहऱ्यावरती अत्यंत राक्षसी हसू आहे. एका फोटोत संतोष देशमुख यांचे कपडे काढण्यात आले होते. एक आरोपी त्यांचा शर्ट काढतोय आणि असं करत असताना हसताना दिसत आहे. त्यांची पँटही काढण्यात आली होती. एका फोटोत संतोष देशमुख हे अत्यंत रक्तबंबाळ अवस्थेत आहेत, मारहाण झालेली आहे आणि एक आरोपी त्यांना तिथे खांद्याला पकडून त्यांच्या सोबत एक सेल्फी काढताना दिसत आहे.
फोटोत एक आरोपी रॉडने पाठीवर मारहाण करताना दिसत आहे. हा एक फोटो पुरावा म्हणून जोडण्यात आलेला आहे. सगळ्या फोटोंमध्ये संतोष देशमुख यांचे कपडे काढलेले आहेत. त्यांना गाडीच्या समोर बसवण्यात आलेलं असून तिथेही त्यांच्यासोबत आरोपी हसताना दिसत आहेत. संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केल्याचा व्हिडीओही काढण्यात आला आहे. सीआयडीने चार्जशीटमध्ये हा सर्व खुलासा केला आहे.
