
Satara Crime News: सातारा शहरातील बसाप्पा पेठ करंजे परिसरात एका शालेय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून तिच्या गळ्याला चाकू लावून एका माथेफिरू प्रेमवीराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आयर्न वाघमळे (वय 18) असं या तरुणाचे नाव आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणाने शाळकरी मुलीच्या गळ्याला थेट चाकू लावत तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित माथेफिरू युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या हातात चाकू असल्याने युवतीच्या जीवास धोका होता. तुम्ही सगळे इथून जावा, असंच तो वारंवार बोलत होता. अखेर सातारा शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत शिफतीने युवकास ताब्यात घेतले. यावेळी जमावाने संबंधित युवकाची चांगलीच धुलाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाकडून याआधी देखील पीडित मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या या युवकाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीचे नाव आर्यन वाघमळे असून तो मूळचा आरळे येथील असून सध्या मोळाचा ओढा येथे राहतो. या माथेफिरू युवकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा, विनयभंग, दुखापत करणे आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माहिती दिली
समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आणि मुलगी काही महिन्यांपूर्वी एकाच परिसरात राहत होते. मात्र, संबंधित मुलीचे कुटुंबीय डिसेंबर महिन्यात दुसरीकडे राहण्यासाठी गेले. त्यानंतरही तो तिला भेटण्यासाठी सतत त्रास देत होता. चल आपण पळून जाऊ असेही तो तिला म्हणत होता. तिने हा प्रकार पालकांच्या कानावरदेखील घातला होता. मात्र तरुणी त्याला दाद देत नसल्याने त्याने थेट तिच्या अपहरणाचाच प्रय़त्न केल्याचे समोर आले.
संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेतून बाहेर पडले. त्याचवेळी आर्यन शाळेच्या बाहेर दबा धरून बसला होता. आरोपीने संबंधित मुलीचा हात धरला त्यानंतर सोबत असलेला चाकू त्याने मुलीच्या गळ्याला लावला. शाळकरी मुलीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका तरुणाच्या बोटाला चाकू लागून तो जखमी झाला. मात्र नंतर पंधरा मिनिटांच्या थरारानंतर अखेर पोलिसांना या मुलीला वाचवण्यास यश आलं आहे.