
निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे: राजगड तालुक्यातील करंजवणे गावात भात लावणीच्या हंगामात एक अनपेक्षित आणि हास्यास्पद घटना घडली. ज्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली. ही घटना गावकऱ्यांसाठी तसेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. या घटनेला स्थानिकांनी ‘चिखलयात्रा’ असं नाव दिलंय. यामागचं कारणही तितकंच रंजक आहे.काय आहे नेमकी घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
करंजवणे गावातील रावसाहेब कांबळे यांच्या शेतात भात लावणीपूर्वी शेतात चिखल तयार करण्याचं काम सुरू होतं. पावसाळ्याच्या दिवसांमुळे शेतात आधीच पाणी साचलेलं होतं, आणि चिखल तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात होता. मात्र शेतातील चिखल इतका खोल आणि चिकट होता की पहिला ट्रॅक्टर त्यात रुतला आणि बाहेर येऊ शकला नाही. या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर आणला गेला. पण तोही चिखलाच्या विळख्यात अडकला. मग तिसरा, चौथा आणि अशा प्रकारे एकामागोमाग तब्बल 10 ट्रॅक्टर चिखलात रुतले. प्रत्येक ट्रॅक्टर दुसऱ्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात शेतात अडकत गेलं, आणि शेताचं रूपांतर जणू ‘ट्रॅक्टरच्या कबरी’मध्ये झालं.
पावसाने वाढवली अडचण
या घटनेदरम्यान पावसाचा जोर कायम होता, ज्यामुळे शेतातील चिखल आणखी गडद आणि चिकट झाला. यामुळे भात लावणीचं काम पूर्णपणे ठप्प झालं. शेतकरी आणि ट्रॅक्टर चालक यांनी एकत्र येऊन तब्बल पाच तास अथक प्रयत्न केले. शेवटी, एका साखळी पद्धतीचा अवलंब करत चार ट्रॅक्टर एकाचवेळी उभे करून त्यांना दोरखंडाने जोडण्यात आलं. या पद्धतीने एकेक ट्रॅक्टर बाहेर ओढण्यात यश मिळालं.
गावात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय
ही अनोखी घटना गावात हास्यविनोदाचा विषय ठरली. गावकरी आणि आजूबाजूच्या परिसरात या ‘चिखलातल्या ट्रॅक्टरपर्वा’ची जोरदार चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यामुळे अनेकांनी यावर मिश्किल टिप्पण्या केल्या. काहींनी याला ‘ट्रॅक्टर रॅली’ असंही संबोधलं.
शेतकऱ्यांसमोरील आव्हान
शेतकऱ्यांसमोरील काही गंभीर समस्यांकडे लक्ष
ही घटना हास्यविनोदाचं कारण ठरली असली तरी ती शेतकऱ्यांसमोरील काही गंभीर समस्यांकडे लक्ष वेधते. पावसाळ्यात शेतीच्या कामांदरम्यान तांत्रिक साधनांच्या मर्यादा आणि शेतमजुरांचा वाढता तुटवडा यामुळे अशा अडचणी निर्माण होतात. या घटनेने शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन अधिक काळजीपूर्वक आणि तांत्रिक साधनांचा वापर योग्य रीतीने करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
अधिक सतर्कता बाळगण्याची शिकवण
शेती हा ग्रामीण जीवनाचा कणा असला, तरी त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक ज्ञान आणि सामूहिक सहकार्याची गरज आहे. ही घटना गावकऱ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरली असून भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी अधिक सतर्कता बाळगण्याची शिकवणही यातून मिळते.