
Thackeray Brothers Unity: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले.यातून भविष्यातील संभाव्य युतीची चर्चा होऊ लागली. याचे राजकीय परिणामही दिसू लागले आहेत. ठाकरे बंधूंच्या एकीकरणाच्या चर्चेनं शिंदेंच्या शिवसेनेतील इनकमिंग थंडावल्याची चर्चा आहे. 40 दिवसांपासून मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेत एकही पक्षप्रवेश झालेला नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकीमुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
नगरसेवक शिंदेंकडून ठाकरेंकडे परतीच्या वाटेवर?
आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार अशी चर्चा आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेतील इनकमिंगला ब्रेक लागलाय का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के दिले होते. ठाकरेंच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, मागील 40 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत एकही पक्षप्रवेश झालेला नाहीये. काही माजी नगरसेवक शिंदेंकडून ठाकरेंकडे परतीच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे लागणारी प्रवेशाची रांग कमी होत असल्याची देखील चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का?
2017मध्ये शिवसेनेकडून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी 53 नगरसेवक ठाकरेंकडे तर 46 नगरसेवक हे एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत. दरम्यान पुढील काही दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसण्याची शक्यता आहे.
आगामी काळात मोठे प्रवेश होणार?
शिंदेंच्या शिवसेनेमधील इनकमिंग थंडावल्याचा दावा शीतल म्हात्रेंनी देखील फेटाळला आहे. काल मुंबईतील दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलंय.तसंच आगामी काळात देखील मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.
पक्ष प्रवेशाला ब्रेक?
ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मोठा उत्साह आहे.. तसंच दोन्ही बंधू एकत्र आल्यास याचा फायदा पालिका निवडणुकीत होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या वाटेवर असलेल्या काही नेत्यांनी आपल्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लावल्याची चर्चा आहे.
ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीनंतर काय आहे महायुतीचा प्लान बी?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीविरोधात महायुतीचा प्लान बी नुकताच समोर आला आहे. जिथं महायुती कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नसून, त्याचसाठी आता रणनिती धुरंधरांकडून प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीच्या अनुषंगानं विचार केला जात असल्याचं स्पष्ट होत आहे. ठाकरेंच्या युतीविरोधात महायुतीचे ‘नो रिस्क’ धोरण असल्याची माहिती समोर आली आहे. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीने एक आराखडा तयार केला असून, यामध्ये जिथं वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे.
बाळासाहेबांच्या खोलीत काय घडलं?
मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले.राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी बाळासाहेबांच्या खोलीत काही वेळ घालवला.बाळासाहेब ठाकरेंचा पलंग, कपाट, पुस्तके, कपडे आजही जशास तसे जपलेली मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीत राज ठाकरे गेले.बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत ठाकरे बंधुनी एकत्रीत वेळ घालवला. यावेळी दोन ठाकरे भाऊ सोडून खोलीत कुणीही नव्हते. दोन्ही भावांनी बाळासाहेबांच्या खोलीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. थोड्या वेळानं रश्मी ठाकरेही राज-उद्धव ठाकरेंसोबत बाळासाहेबांच्या खोलीत आल्या. त्यानंतर संजय राऊत, बाळा नांदगावकर , अविनाश अभ्यंकर खोलीत आले. यादरम्यान केवळ पारिवारिक चर्चा आणि चहा नाश्ता झाल्या.
भेटीनंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल. आम्ही अनेक वर्षानी भेटलो. ज्या घरात वाढलो तिथे भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या खोलीत गेलो. आज बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषेत द्विगुणीत शब्द आहे. पण त्या पेक्षा कित्येक पटीने हा आनंद मोठा आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थवर परतले. यानंतर त्यांनी सोशल मीडियात बंधू भेटीचा फोटो शेयर केला. ज्यावर ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या…’ असे कॅप्शन दिले.