
उपराजधानी नागपुरात गेल्या १२ तासांत दोन धक्कादायक हत्याकांड घडले. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
.
पहिल्या घटनेत इमामवाड्यात कुख्यात गुंड सोनू उर्फ दीपक वासनिक याची हत्या झाली. सोनूविरुद्ध वर्धा शहरात दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह ३० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. एमपीडीए अंतर्गत एक वर्षाची शिक्षा भोगून तो एक दिवसापूर्वीच तुरुंगातून सुटला होता.
मध्यरात्री सोनू त्याच्या मित्रांसोबत दारू पिण्यासाठी गेला असता, जुना मित्र आकाश मेश्राम याच्याशी वाद झाला. वाद विकोपाला जाऊन आकाश आणि त्याच्या साथीदारांनी सोनूच्या डोक्यात दगडाने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी आकाश मेश्रामला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
दुसऱ्या घटनेत यशोधरा नगर परिसरातील शिवछत्रपती मंगल कार्यालयात एका लग्न समारंभादरम्यान विहांग रंगारी या २४ वर्षीय तरुणाची हत्या झाली. बिरजू वाढवे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे काही युवकांसोबत भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना आरोपींनी विहांग रंगारीला चाकूने भोसकून त्याची हत्या केली.
या दोन्ही हत्याकांडांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.