
Raj Thackeray Meeting Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी म्हणजेच 27 जुलै रोजी अचानक ‘मातोश्री’ या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. 5 जुलै रोजी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं हिंदी सक्तीविरुद्धच्या मोर्चा रद्द करण्यात आल्यानंतर त्रिभाषासूत्रीसंदर्भातील आदेश सरकारने मागे घेतल्याबद्दल विजयी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यामुळे रविवारी झालेली ठाकरे बंधुंची भेट ही महिन्याभरातील दुसरी भेट ठरली आहे. उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त राज ‘मातोश्री’वर पोहोचल्याने दोन्ही ठाकरे बंधू लवकरच एकत्र येतील अशी चर्चा दोघांच्या समर्थकांमध्ये सुरु झाली आहे. असं असतानाच आता हे दोघेही पुढे कधी भेटणार हे ठरल्याची माहिती समोर येत आहे.
कुठे होणार पुढली भेट?
राज ठाकरेंनी ‘मातोश्री’ला भेट दिल्यानंतर आता थोरले ठाकरे राज यांच्या निवासस्थानी कधी येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंकडे गणेशोत्सवात गणेशआगमन मोठ्या थाटामाटात होते. अनेकजण राजकीय नेते आणि इतर क्षेत्रातील मान्यवरही राज ठाकरेंच्या निवासस्थानी श्रीगणेश दर्शनासाठी जातात. दोन्ही ठाकरे बंधुंमधील मागील काही काळातील वाढती जवळीक पाहता यंदाच्या गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’वर जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दोघांचे कार्यकर्ते उत्साहात
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमीत्तानं राज ठाकरे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या निमीत्तानं उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणार अशी चर्चा सध्या दोन्ही ठाकरेंच्या अंतर्गत गोटात रंगली आहे. दोन्हीकडील कार्यकर्ते यासाठी विशेष उत्साहात दिसत आहे.
यंदा राज ठाकरेंच्या घरचं गणपतीचं तिसरं वर्ष
यावर्षी राज ठाकरे यांच्या बाप्पाचं तिसरं वर्ष असून आतापर्यंत पहिल्याच दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावल्याचं दिसून आलं होतं. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी येतात. या नेत्यांच्या मांदीयाळीत यंदा उद्धव ठाकरेंचाही समावेश असेल असं सांगितलं जात आहे.
राज ठाकरेंचा शिलेदार फडणवीसांना भेटणार
राज-उद्धव यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीनंतर आता मनसे नेते बाळा नांदगांवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. नांदगांवकर दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं समजतं. त्यांनी भेटीकरता मुख्यमंत्र्यांकडे वेळही मागितली आहे. नाशिकमधील आदिवासी आश्रम शाळा आणि मुंबईतील कोळीबांधवांच्या प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र राज ठाकरेंच्या ‘मातोश्री’भेटीनंतर मनसे नेते फडणवीसांची भेट घेत असल्यानं या भेटीत काही राजकीय चर्चा होतेय का पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याआधीही ठाकरे बंधुंच्या एकीकरणाची चर्चा जोमात सुरु असतांना अचानकच राज ठाकरेंनी एका हॉटेलमध्ये फडणवीसांची भेट घेतली होती. आता देखील राज ठाकरेंच्या ‘मातोश्री’वारीनंतर ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चा जोमात सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा मनसे- फडणवीस भेटीच्या बातमीनं भुवया उंचावल्या आहेत.