
Uddhav Thackeray Shiv Sena On Manikrao Kokate: “राज्यातील फडणवीस सरकारात असे काही ‘माणिक’ आणि ‘रत्न’ भरले आहेत की, त्यांच्यामुळे महाराष्ट्राची ‘शोभा’ झाली नाही असा एकही दिवस जात नाही. त्यांच्या ‘दिव्यत्वा’ची प्रचीती राज्यातील जनतेला रोजच येत आहे. कुणा मंत्र्याकडील पैशांच्या बॅगांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, कुणी आमदार ‘टॉवेल-बनियन गँग’च्या अवतारात आमदार निवासाच्या कॅण्टीनमध्ये घुसून तेथील गरीब कर्मचाऱ्यांना फ्री-स्टाईल मारहाण करीत आहे, कुणी थेट विधान भवनातच मारामारीचा कंडू शमवून घेत आहे. पुन्हा ज्यांच्या नावातच ‘माणिक’ आहे असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल काय बोलावे! मंत्रीपदाची झूल पांघरल्यापासूनच वादग्रस्त वक्तृत्व आणि लाज आणणारे कर्तृत्व असेच त्यांचे सुरू आहे. आता हे कृषीमंत्री एका भलत्याच उद्योगामुळे प्रकाशात आले आहेत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं माणिक कोकाटे प्रकरणावरुन निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कृषीमंत्र्यांना वेळ नसतो, परंतु…
“विधिमंडळात मोबाईलवर ‘रमी’ खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ हॅण्डलवरून हा व्हिडीओ व्हायरल करून कृषीमंत्र्यांचा आणखी एक कारनामा चव्हाट्यावर आणला. महाराष्ट्रात रोज सात-आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मागील तीन महिन्यांतील शेतकरी आत्महत्येचा आकडा तब्बल 650 एवढा भयंकर आहे. त्याची लाज बाळगण्याचे तर दूरच, कृषीमंत्री विधिमंडळात ‘रमी’चा डाव मांडतात हा निर्लज्जपणाचा कळसच म्हणावा लागेल. लातूर येथून आपल्या समस्यांसाठी पायी चालत विधान भवनात आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कृषीमंत्र्यांना वेळ नसतो, परंतु विधिमंडळात मोबाईलवर रमीचा आनंद लुटण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळच वेळ असतो,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
“कृषीमंत्री कोकाटे यांच्या बेमुर्वतखोरपणाचे नमुने पहा,” असं म्हणत कोकाटेंसंदर्भातील वादांची एक यादीच लेखात छापण्यात आली आहे. या लेखातील यादी खालीलप्रमाणे:
> एक रुपयात पीक विमा योजनेवरून “भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही.” असे तारे या महाशयांनी तोडले होते.
> “कर्जमाफीची रक्कम मिळाल्यावर त्यातला एक रुपया तरी शेतकरी शेतात गुंतवतात का? त्यातून लग्न, साखरपुडा उरकतात आणि उधळपट्टी करतात,” अशा शब्दांत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते.
> अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नाशिकमध्ये पाहणी करताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असा उद्दाम सवाल कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांनाच केला होता.
> मी भिकारी शेतकरी नाही, दिलदार शेतकरी आहे.
> शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेच पाहिजे.
> “कांद्याला भाव मिळाला की, शेतकरी कांदाच लावतो आणि मग कांद्याचे भाव पडतात.
असा बेपर्वा कृषीमंत्री झालेला नाही
“आता तर कृषीमंत्र्यांनी त्याहीपुढे मजल मारली. सभागृहात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विविध समस्या यांवर विरोधकांनी काहूर माजवले असताना हे महाशय विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी मोबाईलवर रमी खेळत बसले. कृषीमंत्री म्हणून शेतकरीहिताचे काम करायचे नाही. त्याऐवजी वाटेल तशी मुक्ताफळे उधळायची आणि उरलेल्या वेळात मोबाइलवर रमी खेळायचे. महाराष्ट्राच्या इतिहासात असा बेपर्वा कृषीमंत्री झालेला नाही,” असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
मोबाईलवर ‘रमी’ खेळणारे एक ‘माणिक’…
“राज्यातील शेतकरी अवकाळी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. त्याला आधार देण्याचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व कृषीमंत्र्यांचे आहे. मात्र ते निभावण्याऐवजी बळीराजाला हिणविण्याचे उद्योग ते करीत आहेत. बांधावर शेतकरी गळफास लावून घेत आहेत आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर ‘रमी’चा आनंद लुटत आहेत. एवढे करूनही ‘काही पाप केले नाही’ असा उद्दाम खुलासा ते करीत आहेत. महाराष्ट्राला दिग्गज कृषीमंत्र्यांचा वारसा लाभला आहे. त्या परंपरेच्या कोंदणात आताचे ‘माणिक’ कुठेच बसत नाही. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकेक ‘रत्नं’ भरली आहेत. या ‘रत्नां’च्या खाणीत आता भरविधिमंडळात मोबाईलवर ‘रमी’ खेळणारे एक ‘माणिक’ निपजले आहे,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला.