
Honey Trap In Maharashtra Politics: “फडणवीसांचे सरकार हे कडवट हिंदुत्ववादी वगैरे आहे असे सांगितले जाते. त्यामुळे सत्तेवर येण्याआधी त्यांनी पंचांग पाहून मुहूर्त काढला असेलच. सरकारातील काही जणांनी तर आसामच्या कामाख्या मंदिरात अघोरी पूजा करून सत्तेत प्रवेश केला, पण या सगळ्यांचा मुहूर्त चुकलेला दिसतो. मंत्र्यांचे उपद्व्याप आणि प्रताप ज्या पद्धतीने समोर येत आहेत ते पाहता लवकरच मंत्रिमंडळाचे पत्ते पिसावे लागतील व पाच ते सहा मंत्र्यांना लाथ मारून घरी बसवावे लागेल,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. “राजकीय वर्तुळात अशा मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. संजय शिरसाट, योगेश कदम, माणिक कोकाटे, दादा भुसे, संजय राठोड व नाशिकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या पाच मंत्र्यांपैकी काहींना जावे लागेल. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 132 व इतर दोघांचे मिळून प्रचंड बहुमत असताना सरकारला धक्के बसत आहेत,” असा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखात आहे.
आमदार, खासदारांना अशा ‘ट्रॅप’मध्ये अडकवून सरळ…
“मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘हनी ट्रॅप’ वगैरे काही नाही. अशा तक्रारी कोणत्याही मंत्र्यांनी केल्या नाहीत, फडणवीस यांचे हे बोलणे वरवरचे आणि सरकारची अबू सावरण्यासाठी आहे. प्रत्यक्षात गुप्तचरांनी जी माहिती दिली त्यामुळे फडणवीस यांचीही झोप उडालीच आहे. एकनाथ खडसे यांनी मधल्या काळात फडणवीस यांच्या अगदी जवळच्या एका मंत्र्याबाबत अशा ‘हनी’ प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्राला धक्का वगैरे बसला नाही. मंत्रिमंडळातील 70-75 टक्के मंत्र्यांचे व आमदारांचे चारित्र्य याच प्रकारचे आहे व या सगळ्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करीत आहेत. काँग्रेसचे एक नेते विजय वडेट्टीवार यांनी तर हनी ट्रॅपबाबत भलताच धुरळा उडवला. 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार हनी ट्रॅपमुळे पडले. आमदार, खासदारांना अशा ‘ट्रॅप’मध्ये अडकवून सरळ ब्लॅकमेल केले असेच वडेट्टीवार यांना म्हणायचे आहे. वडेट्टीवार हे अनेक वर्षे राजकारणात आहेत. मंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घ्यावे लागेल. सरकार हनी टॅपमुळे पडले किंवा पाडले हा विषय ऐकून-वाचून सोडून देण्यासारखा नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
आमदार, खासदार, मंत्र्यांचे सध्याचे ‘उसळते’ वर्तन पाहता…
“भाजप किती खालच्या प्रकारच्या राजकारणात गुंतला आहे त्याचा स्फोट वडेट्टीवार यांनी केला. शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार व खासदार ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या धाकामुळे निसटले, तर किमान 18 आमदार व चार खासदार हे दिल्ली, कोल्हापूर, पुणे, नागपूर, नाशिकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये फसल्याने ‘अब्रू’रक्षणासाठी भाजपमध्ये सामील झाले. असे खात्रीने सांगितले गेले की, दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल्स, शासकीय जागांत या काही घडामोडी घडल्या. त्या घडवण्यास उत्तेजन दिले गेले. शिवसेनेतून फुटलेले चार सन्माननीय त्या ट्रॅपमध्ये अडकले व शेवटी त्यांना महान राष्ट्रीय विचाराने भाजपमध्ये सामील व्हावे लागले. हे करून वर दक्षिणा 50 कोटींची मिळाली ती वेगळीच. अनेक आमदारांचेही तेच होते. त्या आमदार, खासदार, मंत्र्यांचे सध्याचे ‘उसळते’ वर्तन पाहता वडेट्टीवार म्हणतात ते खरेच वाटते,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
शिंदे-फडणवीसांच्या गुप्त भेटी?
“महाराष्ट्रातील आमदार-खासदार मागच्या सत्रात ज्या भयकंपित अवस्थेत फुटले तो प्रकार साधा नव्हता. मिंध्यांचे तेवढे बळ अजिबात नव्हते. भाजपकडून काही नाजूक ‘पेन ड्राईव्ह’ समोर आले. त्यामुळे अनेकांची नशा खाडकन उडाली. मिंध्यांबरोबर नऊ ते दहा लोकच होते. नंतर स्वतः फडणवीस व गृहखात्यातील लोकांनी आमदारांना व खासदारांना ब्लॅकमेल केले. ‘‘सुरतला लगेच निघा, नाहीतर ‘सीडी’ बाहेर काढू’’ अशा धमक्या दिल्या. आता काय करायचे, तर भाजपच्या वॉशिंग मशीनच्या गंगेत उड्या मारून शुद्ध व्हायचे. या काळात स्वतः सौभाग्यवती फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला की, त्यांचे पती देवेंद्र फडणवीस हे रात्री- अपरात्री वेश पालटून, हुडी घालून, दाढी-मिश्या लावून कोणत्याही सुरक्षेशिवाय घराबाहेर पडत. (जाताना खिशात काळ्या रंगाचा पेन ड्राईव्ह टाकत ही आमची गुप्त माहिती.) दुसऱ्या बाजूला तेव्हा शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे हे पगडी, दाढीला पट्टी बांधून सरदारजीच्या वेशात येत. लाईटच्या खांबाखाली किंवा एखाद्या पुलाखाली दोघे भेटत. तेव्हा बहुधा ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्यांच्या ‘सीडी’, ‘पेन ड्राईव्ह’बाबत चर्चा व आदान प्रदान झाले हे नक्की. भाजपकडे असे ‘ट्रॅप’ करण्याबाबत यंत्रणा होती. पोलीस खाते त्यांच्या हातात होते. स्वतः पोलीस अधिकारी विरोधकांवर पाळत ठेवून होते,” असा खळबळजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
यात भाजपचे मंत्रीही नक्कीच आहेत
“गुप्त कॅमेरे व पेगासससारखी यंत्रणा इस्रायलमधून आणली होती आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करून आमदार, खासदारांवर ‘ट्रॅप’ लावले. त्या ट्रॅपमुळे तेव्हाचे महाविकास आघाडी सरकार कोसळले हे अलीकडच्या घडामोडींवरून स्पष्ट होते. काही तरुण खासदार, आमदारांच्या ‘बंटी-बबली’ ट्रॅपचे पेन ड्राईव्ह मिंध्यांच्या हाती सोपवल्यावर मिंधे हनी गँगचा सुरत-गुवाहाटी-गोवा असा त्रिखंडी प्रवास सुरू झाला. हे सर्व प्रकरण रहस्यमय चित्रपटाप्रमाणे आहे. या रहस्यमय चित्रपटाची सूत्रे भारतीय जनता पक्षाकडेच होती व आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या जो ‘रम, रमा, रमणी’चा खेळ चालला आहे, त्यात भाजपचे मंत्रीही नक्कीच आहेत,” असंही लेखात म्हटलं आहे.
सरकारचा कोठा झालाय
“गिरीश महाजन यांचा खासमखास प्रफुल लोढा याच्यावर ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मुंबई (साकीनाका, अंधेरी पोलीस स्टेशन), नाशिक, जामनेर येथे पोलिसांनी गुन्हे दाखल केले व लोढाच्या घरांवर धाडी घालून त्यांच्याकडील सीडी, पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी शर्थ करीत आहेत. यात सध्याच्या सरकारातील मंत्र्यांची रहस्ये आहेत. गिरीश महाजन व त्यांच्या लोकांपासून आपल्या जीवितास धोका असल्याचे निवेदन या लोढाने केले. या लोढाचा सत्कार देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी कालपर्यंत केला. ‘हनी ट्रॅप’चा सूत्रधार कदाचित लोढा असेल, पण हनी ट्रॅप मंडळाचे अध्यक्ष ‘महाजन’ वगैरे लोक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘हनी ट्रॅप’चा विषय उडवून लावला. मग प्रफुल लोढाला जीवे मारण्याच्या धमक्या कोणता मंत्री देत आहे? लोढाच्या घरावर पोलीस धाडी का घालत आहेत? हा लोढा भाजपचाच होता. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत. एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करीत सिगारेट फुंकतोय, तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय, चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतोय, पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनी ट्रॅपच्या गुंत्यात फसलाय. ‘रम, रमी, रमणी’च्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय! कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच नाचवीत आहेत,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.