
Ajit Pawar Reacts On Thackeray Alliance: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी आणि खोचक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देताना अजित पवारांचा हा हजरजबाबीपणा पाहून पत्रकारांनाही हसू आल्याशिवाय राहत नाही. आपल्या याच कौशल्याच्या जोरावर अजित पवार अनेकदा राजकीय स्थितीवर भाष्य करताना वेळ मारुन नेतात. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी पुण्यात घडला. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबद्दल सूचक विधान केल्यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना या संभाव्य युतीसंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाला अजित पवारांनी खास आपल्या शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या त्या विधानाने चर्चेला उधाण
मागील अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेच्या युतीबद्दल उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसमोरच सूचक विधान केलं. तुम्ही आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे, असं पत्रकारांनी विचारलं असता माजी मुख्यमंत्र्यांनी, “महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल” असं उत्तर दिलं. उद्धव यांचं हे विधान ठाकरेंच्या युतीवर शिक्कामोर्तब करणारं आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच या संभाव्य युतीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत या घडामोडीवर भाष्य केलं आहे.
अजित पवारांनी ठाकरेंच्या युतीवर आपल्या खास शैलीत दिलं उत्तर
पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर कार्यक्रमस्थळावरुन बाहेर पडताना अजित पवारांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पक्षासोबत युती करण्याचे संकेत दिल्याचा उल्लेख करत पत्रकाराने प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच अजित पवारांनी पत्रकारालाच प्रतिप्रश्न विचारण्यास सुरुवात केली. “राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत. आहेत ना?” असा पहिला प्रश्न अजित पवारांनी पत्रकारालाच विचारला. यावर पत्रकाराने ‘आहेत’ असं उत्तर दिलं.
त्यानंतर अजित पवारांनी, “उद्धव ठाकरे साहेब उबाठाचे प्रमुख आहेत, आहेत ना?” असा पुढचा प्रश्न पत्रकाराला विचारला. यावर पत्रकाराने, ‘आहेत’ असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकल्यावर अजित पवारांनी, “इंजिन आणि मशाल या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. तू, मी चर्चा करुन काय उपयोग आहे?” असा प्रतिप्रश्न करत थेट उत्तर देणं टाळलं.
नक्की वाचा >> ‘राज-उद्धव एकत्र येणार’ असं ऐकताच एकनाथ शिंदे पत्रकारांसमोर हात जोडून म्हणाले, ‘आमची…’
…तर अजित पवारांना मित्रपक्षांबरोबरच लढावं लागेल
काही आठवड्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आणि अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पुण्यात स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरु केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समोर आलं. त्यामुळे असा काही निर्णय झाला तर अजित पवारांना दोन मित्रपक्षांबरोबरच ठाकरेंच्या दोन्ही सेनांच्या युतीविरोधात मैदानात उतरावं लागेल.