
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया
Ulhasnagar News Today: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विनयभंगाचा आरोप असलेल्या आरोपीने जेलमध्ये सुटताच पीडीत तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत व ढोलताशे वाजवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून यानंतर उल्हासनगरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प २ मध्ये रमाबाई टेकडी परिसरात २७ एप्रिलच्या रात्री हंशू बिपिन झा, रोहित झा, सोनमणी झा आणि बिट्टू यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडून घरात घुसत घरातील दोन तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला, असा आरोप होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणातील आरोपी दिवाकर यादवला 16 जुलैला जामीन मिळाला तर रोहित झा आरोपीला 17 जुलैला जामीन मंजूर केला. जेलमधून सुटका होताच दोघांचीही मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आरोपी रोहित झाने पीडित तरुणींच्याच घरासमोर फटाके फोडत ढोल ताशे वाजवत सेलिब्रेशन करण्यात आलं. ही विकृती आली कुठून.गुन्हा केल्याची जराही लाज या आरोपींना वाटली नाही का ? असे अनेक सवाल उपस्थित होतायत.
दरम्यान, आरोपीच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपी रोहित झावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी फरार झाला असून उल्हासनगर पोलीस त्याचा शोध घेतायत. पोलिसांनी कारवाई करत सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ मधील रमाबाई टेकडी येथे २७ एप्रिलच्या रात्री दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाला लोखंडी तलवार आणि रॉडने मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या दिवाकर सह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. मात्र दिवाकर यादव याचा जामीन झाल्यावर फटाके फोडत मिरवणूक काढल्याचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर वायरल झाला आहे